अविस्मरणीय अनुभव...

                           साधारण डिसेंबरचा महिना होता. सगळीकडेच डेज् आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे वारे वाहू लागले होते. याच सुगीच्या काळात कॉलेजचे नोटीस बोर्ड सहलींच्या नोटीसने भरले होते. आमच्या होस्टेल मध्ये सुद्धा ' होस्टेल डे ' दिमाखात पार पडला. आणि या सगळ्याचा विपर्यास म्हणून की काय त्याची हवा आमच्यापण डोक्यात गेली नि आम्ही एक अर्जेंट मीटिंग भरवली आमच्या ग्रुपची..!!आमच्या रूममध्ये मी एकटीच लहान बाकी सगळे शेवटच्या वर्षाला त्यामुळे पिकनिक तर करायची हे कन्फर्म होते. जवळ-जवळ दीड ते दोन तास चाललेल्या त्या मीटिंगचा परामर्श म्हणून की काय शेवटी महाबळेश्वर हे ठिकाण पक्के झाले. सगळे एवढे सेरीअस कधी परीक्षेला पण झाले नसतील.! माझ्या घरी वाई मध्ये नि महाबळेश्वरला काकांकडे सर्वांचा मुक्काम ठरला.

                       पण काहीजणांना अजूनही वाटत होते की मुंबई-मरीन ड्राईव्ह हे ठिकाण पक्के करावे नि जीवाची मुंबई करून यावी.! शेवटी खूप विचार आणि चर्चेअंती सुवर्णमध्य काढून लोहगड पक्के झाले. actually ट्रेक आणि पिकनिक अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील या अनुषंगाने हे उत्तम होते. माझे तर जाणे कॅन्सिल असेच मी गृहीत धरले होते.

                       सगळे सकाळी ६ ला होस्टेल सोडणार होते. मी काहीशी नाराज होते. पण सकाळी ४ लाच यांनी मला झोपेतून उठवले नि तयार केले. मला अजूनपण आठवते सकाळी ५ वाजता आईला phone करून मी घरात परमिशन मागितली. घरातल्यांना पण एवढ्या रात्रीच्या फोन मुळे ' जोर का झटका धीरेसे ' दिला होता.! रात्री ९ वाजता सगळे लास्ट yearवाले लोणावळा सिंहगड कॉलेजला सेमिनारला जाणार आहेत असे रेक्टरला या सगळ्याजणी सांगून आल्या होत्या. आणि जेव्हा माझे 2nd year वाली चे काय काम असं प्रश्न विचारल्यावर तिच्यासाठी पण इलेक्ट्रोनिक्स साठी उपयुक्त सेमिनार आहे असे सांगून खाली जाऊन माझी पण special परमिशन काढून आल्या होत्या या सगळ्या पण मला न सांगता.! खूपच सुखद धक्का होता माझ्यासाठी.! मी जास्तच खुशीत होते.

                      पहाटे बाहेर पडल्यावर आम्ही अण्णा कडे गरमागरम चहा घेतला.सकाळच्या थंडीत आलं घातलेल्या त्या वाफाळलेल्या चहाने आमचा उत्साह आणखीनच द्विगुणीत झाला. आम्ही ७ च्या ट्रेनने शिवाजीनगरहून निघालो. पाऊन-एक तासात आम्ही मळवली स्टेशनला उतरलो. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण आम्ही डोळ्यात साठवत होतो. जणू काही धरित्रीने हिरवा शालू पांघरलेला आहे नि त्यावर छोटी नाजूक गवतफुले सुंदर नक्षी गुंफत आहेत. वाटेत येणाऱ्या धबधब्यामध्ये एकमेकींवर पाणी उडवत आम्ही मस्त भिजलो. कोणी धडपडत होते, एकमेकांशी चिडवत, दंगामस्ती करत कार्ले-भाजे लेणयांकडे आम्ही कूच केले. लेण्यांमधील त्या सुंदर कोरीव कामामुळे आम्ही भारावून गेलो.

                      एकवीरादेवीचे दर्शन घेऊन आमची फौज एका प्राइव्हेट वाहनामधून लोहगडाकडे रवाना झाली. एकमेकांचे हात धरत आमच्या फौजेने गड सर केला. मी शेंडेफळ असल्याकारणाने सगळ्यांचे माझ्याकडे लक्ष होते आणि तेवढीच माझ्याबद्दलची काळजीसुद्धा. दाट धुक्यामध्ये हरवलेल्या गडावर वाट शोधत आम्ही निघालो. गडावर पोहोचल्यावर वरून दिसणारे विहंगमय दृश्य पाहूनच सगळ्यांचा थकवा कुठच्या कुठे पळाला. बराच वेळा फिरून झाल्यावर सगळ्यांनाच्याच पोटात कावळे ओरडू लागले होते. तसे आम्ही सगळे गडावरून खाली आलो. पण जवळपास कोणतेच हॉटेल नसल्यामुळे गावात जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. शेवटी एका टेम्पोवाल्याला मनवून आम्ही लोणावळ्यात आलो.

                      कडकडून भूक लागली असल्यामुळे सगळ्यांनीच यथेच्छ ताव मारला. पेटपूजा झाल्यावर इकडे-तिकडे अशीच भटकंती केली. काहींनी खरेदी केली. नि फिरून कंटाळा आल्यावर आम्ही परत स्टेशनला आलो. लोणावळ्याच्या त्या गोडगुलाबी थंडीमध्ये मस्त कट्टीग चहा घेतला नि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.सूर्य अस्ताला जाताना पाखरे आपल्या घरट्याकडे परततात तसे आम्ही न विसरणाऱ्या आठवणी नि प्रत्येकाच्या फेसबुक अकाऊंटला एक प्रोफाईल पिक्चर घेऊन आपापल्या रूमवर परतलो.मस्त धम्माल अनुभव होता.आमची सेमिनारच्या नावाखाली केलेली लोणावळा ट्रीप अविस्मरणीय ठरली.



Comments

Popular posts from this blog

तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना....

तूच तू...

प्रेमरंग तुझा बावरा....!