तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना....

                           सायंकाळचे चार वाजले होते. रेडीओवरती गाणी ऐकत होते मन रमवण्यासाठी. हातात कॉफीचा मग घेऊन खिडकीपाशी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे पाहत बसले होते. रस्त्यावरती बाईकवरून जाणाऱ्या त्या दोघांना बघून मला हेवा वाटला आणि इतक्यात संदीप-सलीलचे "आताश्या असे हे मला काय होते.. कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते...." हे गाणे चालू झाले. परत आठवणींचे मेघ मनावर दाटून आले. इतका वेळ मनात दाबून ठेवलेल्या असंख्य भावना आणि विचारांचे अश्रुरूपी पाणी गालावरून ओघळले.

                           आज रविवार, पण तरीही आज कश्यातच मन रमत न्हवते. दिवसभर मी शांत, बेडवर तशीच पडून होते. मेसेजेस आणि कॉल्सनी mobile खणखणत होता पण कुणाशी बोलण्यातही मला रस वाटत न्हवता. काय होत होते ते मला काहीच काळात न्हवते. आज पूर्ण एक आठवडा होऊन गेला होता. त्याचे नि माझे काही कारणामुळे चांगलेच भांडण झाले होते. ज्यांना एकमेकांशिवाय एक क्षणही करमत नसायचे असे आम्ही दोघे पूर्ण आठवडा एकमेकांशी बोललो न्हवतो.

                         ' आठवणी ' - किती छान शब्द.पण त्याच आता त्रास देताहेत मला. आपण पहिल्यांदा भेटलो ते chemistry lab जवळ. साधारण उंची, गोल चेहरा, साजेसा framless चष्मा, मस्त गोड हास्य आणि तुझे ते लाघवी बोलणे. कदाचित त्यामुळेच की काय मी तुझ्या प्रेमात पडले असेन! हळूहळू ही मैत्री प्रेमात कधी बदलली कळलेच नाही मला.

                            एकमेकांची काळजी वाटणे आणि कधी लटकेच रागावणे नि तू माझी वेडी समजूत काढणे. एकदा तर बाईक घेऊन आलास नि म्हनालास "लवकर, ये खाली.." काय झाले विचारले तर म्हणलास, "चल, मस्त आभाळ दाटून आलेय. थोड्या वेळात पाऊस चालू होईल.. मन म्हणेल तिकडे फिरून येऊ नि कंटाळल्यावर चहा पिऊन येऊ परत.." तुझे ते बिनधास्त वागणेच मला खूप आवडायचे. तुझ्याबरोबर अनुभवलेले असे एक ना अनेक क्षण... आपल्या विचारांमध्ये किती तफावत मला chilled कॉफी तर तुला वाफाळलेला चहा आवडायचा,आपल्या सवयी वेगळ्या.. मला AC हवा तर तुला नको. पण तरी खूप कमी वेळात आपल्यामध्ये एक सुंदर नि छान नाते निर्माण झाले होते. एकमेकांची इतकी सवय झाली आहे आता आपल्याला... पण.....

                          तुझ्या मेसेजची वाट बघतेय सकाळपासून. आता तरी तुझा call येईल नि सगळे काही परत पूर्वीसारखे होईल. विचार करून करून मन सुन्न झालंय आता.. तुला माझी आठवण येत नसेल का... माझ्याप्रमाणेच तुझ्याही मनात आपल्या आठवणींचे काहूर माजले असेल का.. तुझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावत असतील का..

                          "वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू , विरहाच्या पापणीत आपण दोघे बसू..."

                         बस ना आता,पुरे हा अबोला.. तुझा विरह नाही सहन होत मला.. मी तुझी वाट बघतेय... तू येशील नक्की याची मला खात्री आहे. आपली स्वप्ने पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील.. मला खात्री आहे...







Comments

Popular posts from this blog

तूच तू...

प्रेमरंग तुझा बावरा....!