प्रेमरंग तुझा बावरा....!

            पहिल्यांदा कधी भेटला, कसा भेटला,नाहीच आठवत..! कधी त्याची ओढ लागली मनाला.. कोणता होता तो दिवस. हेही नाहीच आठवत..! मोठं होता होता त्याच्यासोबत आपली किती स्वप्नं मोठी झाली, किती इच्छा तरुण झाल्या... आठवू म्हटलं तरी नाहीच आठवत !

           मग तरी का येतो आजही त्याच्या आठवणींचा वेडावणारा गंध.? जरा आत उकरल, कि मनाची माती आजही तशीच गंधभारली भासते. त्याचं असं नुस्त नाव जरी काढलं तरी मनात कधीकधी रिमझिमायला लागतो आनंद..! आणि कधी उगाच दाटून येतं मळभ.... कधी रुणझुणतात सुखाच्या तारा आणि कधी मात्र जीव कासावीस होत डोळ्याला लागतात धारा...

           काल अचानकच तुझी खूप आठवण आली. राह्वेनासे झाले.. अस्वस्थता मनाला शांत बसू देईना. आणि कसंबसं धैर्य एकवटून नंबर आठवून फोन लावला तुला. प्रेम.... एक सुंदर, मनाला वेड लावणारी, स्वप्नातील गोष्टी सत्यात उतरवणारी भावना, जवळच्या व्यक्तीची ती प्रचंड ओढ. एक सुंदरसं, नाजुकसं, अवखळ फुलपाखरू ! स्वच्छंदी उडणारं, मनाला वाटेल तिथे घेऊन जाणारं... फोन उचलताच तुझा उत्तरासम प्रतिसाद, “हाय, बोल ना कशी आहेस..” मला आकाशात उडाल्याचा आनंद.. याच शब्दांची मी कित्येक वर्षे आतुरतेने वाट बघत होते.

         आजही तो दिवस मला आठवतो. मी तुझ्या स्टुडीओमध्ये आले होते. तु काढलेली modern art ची खूप सारी पेंटिंग्ज, खूप सारे कोरे कार्डबोर्ड्स, अत्यावस्थ पडलेले रंग आणि ब्रश.. त्यातच एक शांत बुद्धाचे पोर्ट्रेट आणि अतिशय सुंदर उडणारया अल्लड फुलपाखरचे ४ बाय ४ चे पेंटींग.. या पेंटीग पाशी आल्यावर मात्र तू बराच वेळ थांबलास आणि मला विचारलेस, “काय दिसतय तुला यामध्ये?” ते फुलपाखरू वर पाहता अतिशय सुंदर होते पण तरीही कुठेतरी उदासी जाणवत होती त्या पेंटीगमध्ये. २ मिनिटे मी स्तब्ध झाले नि तुला विचारले, “कितीही लपवायचा प्रयत्न केलास तरी माझ्याकडेच येतोचस ना परत.. तुला स्वच्छंदी उडायचय पण तू कधीही नात्यांमध्ये अडकणारा नाहीयेस. तुझ प्रेम त्याही पलीकडे आहे.. आज मला स्टुडीओमध्ये बोलवण्याचा तुझा हेतू सफल. ना शब्दांची ना स्पर्शाची भाषा.. त्याहीपालीकडचे काहीतरी जे फक्त दोघांना कळेल ते हि कुंचल्यातून उमटलेल्या रंगांद्वारे.. तुझ्या प्रत्येक कवितेतील ‘मी वेडी प्रेयसी’ मला समजणार नाही तर आणखी कुणाला..” माझी मी न राहिलेली तुझी कधी झाले समजले नाही.. तुझ्या पेंटिंग्ज आणि कवितांमधून तुझ्यापर्यंत पोहचले-

                   मी शब्दांच्या काठांवrti शोधत असता काही,
                   हलके हलके मौनामध्ये अर्थ मिसळले सारे...”

              आजही तो क्षण मी जपून ठेवला आहे मोरपिसासारखा.. वहीचे पान उलटले कि ते मोरपिस फिरवून तुझ्या जगात आल्याचा आनंद मिळतो. फोन उचलल्यावर तू मला लगेच ओळखलेस.. ४ वर्षानंतर सुद्धा काहीच बदलले नव्हते आपल्यामध्ये.. तू नेहमीच माझा होतास नि नेहमीच मी तुझी.. इतके दिवस तू फोन का नाही केलास म्हणून तुझ्यावर रागाऊ शकत नाही मी कधीच.. आपण कधी स्वतःवर रागावतो का..!

                       एक सांगशील?

                       आपले रस्ते अवचित कुठे,

                       कसे जुळले,

                       आपल्याच नादात चालताना

                       हे देखणे वळण कसे भेटले?

                       क्षणाभोवती

                       ही असली अनोखी रंगत

                      खुलते आहे?

                      जगणं व्हावं गाणं...

                     अशी स्वरांची संगत

                     जुळते आहे!

               तुझ्याशी फोनवर बोलून खूपच छान वाटले. परत कामाला लागले एका नव्या जोमाने, उत्साहाने.. पण आज कदाचित तो निसर्गदेखील माझ्या जल्लोषात सहभागी होऊ इच्छित होता नि तो बरसू लागला. त्याची रिपरिप जशी वाढू लागली तश्या आठवणी मनात रुंजी घालू लागल्या. रूममध्ये पावले थांबेनात. तुझ्याकडे तर येऊ शकत नव्हते मग एकटीच आले आपल्या नेहमीच्या ब्रिजवर. ती सृष्टी आपल्यासाठी आनंदाचे गीत गात होती. वेडी, धुंद, आपल्याच नादात संथपणे वाहणारी, थोडीशी लाजणारी ती नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा परतीचा प्रवास राहतोच कुठे.. माझेही याहून काही वेगळे नाही.








-भाग्यश्री आनंद सकुंडे



Comments

Popular posts from this blog

तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना....

तूच तू...