गणेशोत्सवाचे बदलते रूप....

               कॉलेज मधून नेहमीप्रमाणेच संध्याकाळी रूमवर आले. चहा टाकणार इतक्यात बेल वाजली. “वर्गणीसाठी आलोय, तुम्ही किती लोक राहता, आम्ही प्रत्येकी १००/- रु घेतो आणि हे विद्यार्थ्यांसाठी देखील कम्पलसरी आहे.” अरे काय हि भाषा! वर्गणी गोळा करता कि हफ्ता. जबरदस्ती आहे काय.!! टिळकांनी सुरु गेलेल्या गणेशोत्सवात सांगितले नव्हते जबरदस्तीने पैसे गोळा करा म्हणून. आणि ते हि अश्या पद्धतीने.! वर्गणी असतेच मनापासून आपण भक्तिभावाने दिलेली देणगी. gos वर चहा जोरोरात खळखळत होता नि मी विचारचक्रात डुंबत होते.

               गणेशोत्सव..!!! लहानापासून थोरांपर्यंत आनंद पर्वणी! या दिवसात पुण्याचे पूर्ण रुपडं पालटून जाते. पेठांमधले वातावरणच वेगळे असते. ढोल दणाणू लागतात.. मंडप, डेकोरेशन, सजावट या विषयांनी मित्रांचे कट्टे रात्ररात्रभर जागू लागतात.. तरुणाईचा भन्नाट उत्साह नि सळसळता जोश बघायला मिळतो तो याच दिवसात..! वेध असतात ते गणेशोत्सवाचे.. त्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे.. तो बाप्पाच घेऊन येतो तो नवा जोश नि नवा उत्साह..

              बाप्पा, आज तुझ्याशी थोडं बोलायचय. तू बुद्धीची देवता, कलांची देवता तुझा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू दे पण आज आणखी काहीतरी हवय तुझ्याकडून. हो, माहितेय मला खूप सारे नवसांची रांग आहे तुझ्याकडे नि त्याच बरोबर नारळ, मोठेमोठे हार, मिठाई आणि बरच काही. पण बाप्पा मी तुला काहीच देणार नाही. काही देऊन काही घ्यायचे असा व्यवहार आपल्यात नाही. हो पण हात जोडून तुझ्या चरणी स्वतःला वाहून घेईन. तुझ्या आवडीचे तुझ्या पायांवरचे जास्वंदीचे फुल व्हायला मला आवडेल. बाकी या पामराकडे काहीच नाही.

             पण तरीही एक मागणे आहे माझे पुरवशील का? तुझ्या नावाखाली होणारे बाजारीकरण फक्त थांबव, थोडी जास्त अक्कल आम्हाला दे. थोडीशी माणुसकी आमच्यासाठी घेऊन ये. म्हणजे आम्ही बाहेर काही खात असताना समोर येणारे चिमुकले हात असतील त्यांना खायला मिळू दे, त्यांना शिक्षण मिळू दे. तुझा उत्सवासाठी जसे सगळे एकत्र येतात तसेच सगळे कायम एकत्र राहोत, कोणतेही भांडण नि हेवेदावे नको त्यासाठी थोडेसे निस्वार्थीपण आमच्यासाठी घेऊन ये. तुझ्यासमोर नाचातानाचा जो आमचा उत्सह असतो तो तसाच कायम राहूदे फक्त तो नक्की वापरायचा कुठे याची थोडी ‘जास्त’ अक्कल आम्हाला दे.

            आमच्या पिढीकडे तुझ्या आशीर्वादाने सर्व काही आहेच पण आम्हाला एक योग्य दिशा दे मग हा भारत देश सुजलाम सुफलाम होईलच. प्रभू श्रीरामांचे ‘रामराज्य’ येईल. जगाच्या इतिहासात मानानं झेंडा फडकवण्यासाठीचे थोडं बळ आम्हाला दे. बाकी मला काहीच नकोय. सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. सुख, आरोग्य, आनंद, ऐश्वर्य बुद्धी आणि कला याबरोबरच थोडे जास्तीचे शहाणपण आम्हाला घेऊन ये.

            गणपती बाप्पा मोरया..!! बाप्पा तू तारून नेशील नेहमीप्रमाणेच..

            मला खात्री आहेच.



     - बदल करू पाहणारी, डॉल्बी नाहीतर ढोलाच्या तालावर ठेका धरणारी तुझी लहान भक्त





Comments

Popular posts from this blog

तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना....

तूच तू...

प्रेमरंग तुझा बावरा....!