Posts

Showing posts from April, 2016

तूच तू...

Image
"तूच तू..." सुखाचा "स्पर्श" तू.. माझा गुंतलेला श्वास तू.. आयुष्य रंगवून टाकणारा अनामिक रंग तू.. मी अंतर्मनात जपलेला षड्ज तू.. मला विरघळवून टाकणारा माझा शिंपला तू.. माझ्या प्रत्येक श्वासात झिरपणारा थेंब तू..   कोणती जादू ही, माझे मलाच उमजेना..! आणि माझ्यात माझ्यापेक्षा जास्त होणारा तू.. तुझा गंध माझा, तुझा रंग माझा, स्पर्श माझा... श्वासही तू माझाच, ती धुंद मिठी ही माझीच... माझे म्हणायला माझे आहे तरी काय.. मी सर्वस्वी तुझीच..!!

बकुळफुलांची शपथ...

Image
'तो' आल्यावर मी सगळ्या ढगांना तुझं नाव विचारते अन् सगळ्या विजांशी तुझ्यासाठीच भांडत राहते दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत हेलकावणाऱ्या ओंडक्यासारखी मी अन् पहाडावर उगवत्या सूर्यासारखा तू, आणि आता तर आपण एकमेकांचे कोणीच नसतानाही, 'तो' आहेच, जो पूर्वी आपल्यात होता... आपला पाऊस.! तू मला दिलेल्या बकुळीच्या फुलांची शपथ, मी फुलांचा गंध आणि तुझ्या पहिल्या स्पर्शाचा ओला सुंगंधही अजून काळजात जपून ठेवला आहे.. ते घरट्याकडे परतणारे पक्षी, तो मावळतीचा सूर्य सारे रोज मला तुझ्याबद्दल विचारतात.. आता तुझ्याशिवाय संध्याकाळ........... मग अचानक शब्दांचे अश्रू ओघळतात गालांवरून.. मी एकटीच कॉफीचे घोट घेत गॅलरीत उभी असते...... पण यापुढच्या संध्याकाळी सोबत जगता येणार नाही हे समजायला वेळ लागतोय मला... तू पावसाच्या बरसण्याचं आणि माझ्या रडण्याचं कारण नको विचारुस.. तू पावसाच्या वाहण्याला अन् माझ्या रीतं होत जाण्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर जमल्यास.. मी डोळे पुसते माझे अन खिडकीतून त्याला पाहत राहते.. तुझ्या बोटांचे ठसे उमटलेल्या तुझ्या आवडत्या पुस्तकाला मी मग कुरवाळत बसते...