" ओलेचिंब मन माझे..."

वेडा वारा तुझ्या शोधात निघाला, कातर माझा सूर झाला तू नसताना भिजले हे मन पुन्हा, तुझिया आठवांच्या वेदना कवटाळताना... बेहोश वारा मनरंगी झुलताना, जाणता अजाणता तुझ्यात विरघळताना तो थेंब शिंपल्यात लपताना, जणू तू मला घट्ट मिठीत घेताना आभाळी घन दाटताना, बावरी सोनपालवी फुलताना धरतीला 'तो' मिळताना गंध उधळत, ती हळवी दुपार कलताना तुझ्या स्मृतींच्या वेदना चुरचुरताना, तू नसताना तुझ्यासवे भिजताना मेघांच्या रंगात हरवताना, निथळून गेले ते सावळे क्षण अनुभवताना आठवांच्या गर्द रानी झाडांच्या ओठी ओली थरथर, पानांचे थेंब गळून पडताना साऱ्या दिशांना भास हा तुझा, स्मरणांचा पाऊस ओथंबताना, मोहर सारा उतरताना तुझिया स्पर्शांच्या स्मृती झुरताना, रिमझिम तू माझ्यात ओझरताना तोडूनी त्या जबाबदाऱ्यांचे बंधपाश सारे तू ये ना.... तो धुक्याचा पडदा सारून तू ये ना... मी शमणार तुझ्याविण नाही तू ये ना.... माझा सूर उमटणार तुझ्याविण नाही तू ये ना... हिरवी पालवी फुलणार ना तुझ्याविण नाही तू ये ना.... गंध भेटीतला, मूक विरहातला, चहूकडे तुझेच संमोहन या साऱ्या वाटा सुन्या तुझियाविण तू ये ना....